Ad will apear here
Next
सरसेनापती हंबीरराव मोहिते


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा १६ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
.....
हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने ‘बाजी’ हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पाहावयास मिळते. 

स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते शहाजीराजेंच्या लष्करात होते. ते पुढे कर्नाटकला गेले. त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. 

पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छ. राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजींचे अगदी जवळचे घराणे झाले. यातील संभाजी मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. 

शहाजीराजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार. भोसले घराण्याशी आपले संबंध जुळावेत म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणी उत्सुक असत आणि त्या काळी भोसले घराण्याशी सोयरीक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानीत असत. त्यापैकीच एक घराणे म्हणजे मोहिते घराणे होय. 

स्वराज्यस्थापनेच्या पूर्वी मोहिते घराण्यातील अनेक पुरुषांनी आपल्या कर्तबगार घराण्याला साजेशी अशी कामगिरी करून दाखवत घराण्याचा नावलौकिक वाढवला होता आणि पुढे छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्येदेखील मोहिते घराण्यातील वीरांनी आपले कर्तृत्व गाजवून हा वसा पुढे चालवला. 

मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला, जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शहाजीराजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय. 

संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनीदेखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र छ. राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरीक अधिक घट्ट केली. हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घरण्याचा वारसा लाभला होता. आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतेही संकट असेना, त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे हाच ते आपला धर्म मानीत असत. 

प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खानाविरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले, त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला. 

त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापराव गुजरांसारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून छ. शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली. सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला. अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे ते पहिले सरसेनापती!

हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेसमोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखानासोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. 

या लढाईत त्यांनी सहा तासांत ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के आढळतात. त्या काळात छ. शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे बोलले जाते. म्हणजे एखाद्या मावळ्याने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले, तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक शिक्का उमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवर सहा शिक्के आहेत. असा पराक्रम अन्य कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही. 

राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी वाढली होती. शत्रू सैन्य चहूबाजूंनी टपून बसले होते. अशा वेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंद्या सेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली. 

हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूर, वरकडपर्यंत मजल मारीत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले. 

दिवसागणिक त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता. शत्रू सैन्य हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागले. इकडे मुघलांसोबत आदिलशाहीलादेखील त्यांनी जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला त्यांनी स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले. 

सरसेनापतीचे पद स्वीकारल्यापासून क्षणाचीही उसंत न घेता, मोहिमांवर मोहिमा काढून हंबीरराव चहूबाजूंना स्वराज्याची पताका फडकावीत होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. स्वराज्य पोरके झाले. 

शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरले पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती. परंतु दरबारातील एका गटाने छ. संभाजी महाराजांना गादीवर न बसवता छ. राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला; पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र छ. संभाजी महाराजांना पाठिंबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे छ. संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले. 

संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बुऱ्हाणपुरची लूट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मुघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला. 

रामशेजच्या किल्ल्याची लढाई इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती. 

यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बहादूरखान आणि शहाजादा आझम यांनादेखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीरराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली. 

हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सर्जाखानविरुद्धची लढाई होय. या लढाईतदेखील आपल्या कर्तृत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून १६ डिसेंबर १६६७ रोजी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा; पण त्यांनी आपला अमूल्य हिरा मात्र गमावला. 

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत, शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी छ. शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या श्रीमंत छत्रपती महाराणी ताराराणी यांनीही आपल्या पित्याप्रमाणेच इतिहासात आपले नाव अजरामर केले. 

स्वराज्याच्या या सरसेनापतीस स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LVOCCT
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.
शूरवीर दत्ताजी शिंदे दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते. उत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्या वेळी उत्तरेतील तीर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे
समाजक्रांतीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तीन जानेवारी ही युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हजारो वर्षे सामाजिक बंधनात अडकलेल्या स्त्रियांना ज्ञानाची कवाडे खुली करून देणाऱ्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीत अडकलेल्या शूद्र व अतिशूद्रांचे कल्याण करणाऱ्या समाजक्रांतीच्या प्रणेत्या म्हणजे सावित्रीबाई फुले होत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language